तिच्याबाबतीत किती तो चुकला!
एकदा चुकला आणि बस… चुकतच गेला!
जणू एक सवय… जणू एक व्यसन,
तिच्याबद्दल सतत judgmental होऊन विसरलाच तो करायला मनन!
मनन तिच्याबद्दल त्याच्या बदलत जाणार्या भावनांचे,
मनन तिच्याबद्दल असलेल्या गैरसमजांचे!
मनाशी तो ठरवून बस बसला – की ही आहे अशी,
कधी समजून घेण्याचा प्रयत्न त्याच्या डोक्याने त्याला करूच दिला नाही की ती खरच आहे तरी का तशी!
बदलायला हवी होती ती त्याला… कायम.
तरीही ती उभी राहिली त्याच्या पाठीशी… भक्कम!
हो… नव्हताच तिला पुस्तकात रस,
नव्हतेच तिला अभ्यासाचे आकर्षण.
तिला होता माणसांत रस,
तिला होते प्रेमाचे आकर्षण!
म्हणुन रमायची ती त्याच्या घरच्यांत,
ज्यानी कधीही नाही कोंडले त्या मैनेला पिंजर्यात!
ना समाजाने ठरवलेल्या संस्कारांच्या पिंजर्यात,
ना त्यांच्या स्वतःच्या विचारधारेच्या पिंजर्यात.
त्यांचे घर आधीपासूनच होते त्या मैनेचे घरटे,
स्वच्छंदी फिरून परतल्यावर ज्यानी कधीही नाही सोडले तिला एकटे!
पण त्याच्या नजरेत – ती होती फक्त मजा मस्ती करणारी मुलगी.
कितीही काही केले तरी तिला तो समजूच शकला नाही.
त्याच्या assistant वर होता त्याचा विश्वास,
स्वताच्या बायकोला मात्र तो सतत उभं करायचा आरोपांच्या खटल्यात!
तिचे मन मात्र तरी अडकले होत़े त्याच्या प्रेम-बंधनात,
म्हणुनच कदाचित कितीही जरी तो दुखवत गेला तरी त्याला सोडून जाणे नव्हतेच तिच्या हातात.
कदाचित एक कारण असेही असावे की संपूर्ण चूक कधी त्याचीही नव्हती,
एक नको असलेल्या नात्यात गुंतून ते नातं इतके जवळचे होईल याची कल्पना त्याला तरी कुठे होती!
एका वर्षानंतर ती जाईल निघून – सतत होतेच कुठेतरी त्याच्या मनात,
तिच्या प्रेमात पडून कसा जगणार होता तो जेव्हा ती नसणार होती त्याच्या सत्यात!
पण तरीही तिला दुखवण्याचा हक्क नव्हता त्याला,
स्वतःच्या प्रेमात पाडून तिला एकटे पाडायचा हक्क नव्हता त्याला.
प्रेमा व्यतिरिक्त तिने मागितले तरी होते काय?
का इतके कठीण होते उघडणे मनाचे डोळे, बंद करून डोक्याचे कान?